Join us  

मुंबई, ठाण्यात आजपासून ‘मेघ’मल्हार, 'बिपाेरजाॅय'मुळे पावसाच्या सरी सर्वदूर कोसळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 5:47 AM

अरबी समुद्रात उठलेले बिपोरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अरबी समुद्रात उठलेले बिपोरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत असले तरीदेखील या वादळाचा प्रभाव म्हणून कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला वारा आणि पावसाचा इशारा मंगळवारी कायम आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील आणि पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बिपोरजॉय चक्रीवादळ पुढे सरकले तरी त्याचा आस मागे राहत असून, चक्रीवादळाचे ढग पाऊस घेऊन येतात. हा पाऊस मंगळवारी मुंबईत कोसळू शकतो आणि याच काळात मुंबईत वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रात्री नऊ नंतर पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याचे चित्र होते.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सागरावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरच्या दगडी बंधाऱ्याला समुद्राच्या लाटा आक्रमकपणे धडकत होत्या. कुलाबा येथे उधाणाच्या भरतीच्या लाटांनी सागरकिनाऱ्यावरील बंधाऱ्याला असे जोरदार धक्के दिले. सागराच्या या वेगळ्या रौद्र रूपातही किनाऱ्यावरील मुलांनी आपला भिजण्याचा आनंद लुटला.

पालघरमध्ये विजेचा लपंडाव

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर जिल्ह्यात दोन दिवस अनेक भागांत पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यात महावितरणचे सुमारे ४० विद्युतवाहक पोल कोसळून पडले. परिणामी, जिल्ह्यातील अनेक भागांचा विद्युत प्रवाह खंडित झाला.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय असल्याने किनारपट्टी भागात ४० ते ६० कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या बहुतांश भागांत दिसून आला. काही ठिकाणी झाडे तुटण्याच्या घटना घडल्या. 

तसेच वाडा, मोखाडा, पालघर तालुक्यातील काही घरांची पडझड झाली. वसई-विरार शहर परिसरातही झाडे, होर्डिंग विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :मुंबईचक्रीवादळठाणेपालघर