मुंबईकरांची पाऊसकोंडी; वाहतुकीच्या खोळंब्याने मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:48 AM2018-08-22T05:48:30+5:302018-08-22T05:48:57+5:30
पावसादरम्यान ठिकठिकाणी वाहतूककोंडीनेही मुंबईकरांच्या मनस्तापात भर घातली होती
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या पावसाने मंगळवारीही आपला वेग कायम ठेवला. मंगळवारी सकाळपासूनच शहर आणि उपनगरात कोसळत असलेल्या पावसाचे प्रमाण कमी असले, तरी अधून-मधून वेगाने बरसत असलेल्या जोरदार सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडत होती. पावसादरम्यान ठिकठिकाणी वाहतूककोंडीनेही मुंबईकरांच्या मनस्तापात भर घातली होती.
मंगळवारी सकाळपासूनच शहर आणि उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. मागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रुझ येथे अनुक्रमे ४.२, ४.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १३.६५, पूर्व उपनगरात १५.७०, पश्चिम उपनगरात ८.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात एक ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. शहरात २, पूर्व उपनगरात ४, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण आठ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २, पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत माथेरान येथे सर्वाधिक १३१ मिमी पावसाची नोंद झाली.
भातसा ओव्हर फ्लो
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. जिल्ह्यातील भातसा धरण मंगळवारी सकाळपासून पुन्हा ओव्हर फ्लो झाल्याने, त्याचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बारवी धारण १०० टक्के भरले असून, पाण्याची पातळी ६८.८८ मीटर झाली आहे.