गणेशोत्सवात प्रथमच दहाही दिवस पाऊस; अनंत चतुर्दशीलाही पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:09 AM2019-09-08T01:09:27+5:302019-09-08T01:09:45+5:30
५ वर्षांमधील पहिलीच वेळ
विश्वास खोड
मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतपाऊस अधूनमधून हजेरी लावत असला तरी यंदा प्रथमच उत्सवाच्या सुरुवातीपासून रोजच पावसाने हजेरी लावण्याची गेल्या ५ वर्षांमधील ही पहिली वेळ आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत (१२ सप्टेंबर)दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश मिळण्याची चिन्ह कमीच असून संपूृर्ण उत्सव संपेपर्यंत मुंबईवर पावसाचे सावट असणार आहे.
मुंबईकरांना गणेशोत्सवात पाऊस होण्याचा अनुभव नवा नाही. मात्र २०१५ पासून गतवर्षीपर्यंत सलग दहा दिवस पाऊस झाल्याची नोंद नव्हती. २०१५ मध्ये १७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी होती. १९ तारखेला मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, डहाणू, बुलडाणा, नागपूर आणि मालेगावमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती.
२०१६ मध्ये ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्या दिवशी आकाश अंशत: ढगाळ होते. ७ तारखेला दुपारी हलका पाऊस झाला. ९, १०, १४ आणि १५ या तारखांना हलका पाऊस मुंबईत झाला.
२०१७ मध्ये आॅगस्ट अखेर गणेशोत्सवाला सुरुवात झाली. २५ आॅगस्ट रोजी प्रतिष्ठापना झाल्यानंतर उत्सवात रंग भरले. मात्र २९ आॅगस्ट रोजी झालेल्या तडाखेदार पावसामुळे मुंबई तुंबली. १२ तासांमध्ये तब्बल ३७.१७ इंच इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. १९९७ नंतर तब्बल १० वर्षांनी आॅगस्ट महिन्यात इतका प्रचंड पाऊस झाला होता.
गेल्या वर्षी, २०१८ मध्ये १३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना झाली. १४, १५, १६ आणि १९ तारखेला हलकासा पाऊस झाला. २३ तारखेला, म्हणजे अनंत चतुर्दशीच्या सुमारास आकाश अंशत: ढगाळ होते.
यंदा गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू झाला. त्या सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ३ तारखेला, मंगळवारी रात्री १२ पासून पहाटे ६ पर्यंत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. ४ तारखेलाही सकाळी ६ ते १२ आणि सायंकाळी ६ नंतर पाऊस कोसळला. ६ तारखेलाही अशीच स्थिती होती. शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ नंतर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत
होत्या. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
रविवारीपासून गुरुवारपर्यंत आकाश मुख्यत: ढगाळ राहील. अनंत चतुर्दशी १२ तारखेला असून त्या दिवशीही आकाश मुख्यत: ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता आहे. ८, ९, १० व ११ तारखेलाही हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.सकाळ-सायंकाळ पावसाच्या सरींचा तडाखा बसत असल्याने उत्सव मंडपांच्या ठिकाणी वर्दळ कमी आहे.