Join us

पाऊस आला रे... मान्सूनपूर्व जोरदार सरी, मुंबईकरांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 5:49 AM

उकाडा, घामाच्या धारा आणि तापदायक उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. शनिवारी रात्री चेंबूर, घाटकोपर, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरीवली, पवई, कांजूरमार्गसह लगतच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

मुंबई : उकाडा, घामाच्या धारा आणि तापदायक उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. शनिवारी रात्री चेंबूर, घाटकोपर, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरीवली, पवई, कांजूरमार्गसह लगतच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईकर काही काळ का होईना सुखावले.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मान्सूनची वाटचाल ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात व मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागात स्थिर आहे. मान्सूनची वाटचाल स्थिर असतानाच शनिवारी रात्री मुंबईत ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली. शनिवारी सकाळीच मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र ढगाळ वातावरण निवळले. मात्र सायंकाळी पुन्हा मुंबई शहर आणि उपनगरात ढग दाटून आले; आणि वातावरणात बदल झाला. वातावरणात बदल होत असतानाच काळोख्या रात्री पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, रविवारसह सोमवारी मुंबईमधील आकाश अंशत: ढगाळ राहील. काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २८ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ढगांचा गडगडाटही सुरू होता. उपनगरे, ठाणे, नवी मुंबई, कोकण, कोल्हापूर, नाशिक, जळगाव तसेच विदर्भात काही भागांत दुपारनंतर पावसाने हजेरी लावली होती.झाडे कोसळलीवडाळा येथे ८ मिमी, धारावी ५, कुर्ला ३४, चेंबूर २२, कांदिवली ३४, गोरेगाव २३, दहिसर २०, बीकेसी २३, अंधेरी २२, दिंडोशी येथे २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक झाड कोसळण्याचीघटना घडली आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव न्यू लिंक रोड येथील भगतसिंग नगर, कांदिवली येथील आनंद नगर, चेंबूर येथील आचार्य मार्ग येथे काही प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.पावसाचा विमान प्रवाशांना फटकापावसाचा फटका विमान प्रवाशांना बसला. मुंबईकडे येणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले. खराब हवामानामुळे लँडिंग व उड्डाणांना सरासरी पाऊण तास विलंब झाला. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत १२२ विमानांचे लँडिंग सरासरी पाऊण तास उशिराने झाले.नवी मुंबईकरांची त्रेधातिरपीटशनिवारी संध्याकाळीच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनपेक्षित पावसांच्या धारांमुळे घराच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. विजांच्या कडकडाटामुळे प्रवाशांच्या काळजात धडकी भरत होती. तर विजेपासूनचा धोका टाळण्यासाठी काहींनी घराबाहेर निघणे टाळले. पहिल्या पावसाच्या हजेरीने नवी मुंबईकरांची दैना उडाली.रायगडमध्येही हजेरीमहाड, पोलादपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी महाड तालुक्यातील वाकी ३०-४० घरांचे नुकसान झाले . वादळी पावसामुळे वृक्ष देखील कोलमंडले आहेत. कर्जत, अलिबाग, पनवेल, रेवदंडा परिसरातही पावसाने पडला.

टॅग्स :मुंबईपाऊस