Join us

पावसाने केली साइडपट्ट्यांची वाताहत

By admin | Published: June 30, 2015 10:24 PM

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. रात्रंदिवस पावसाचा जोर असून यामुळे सर्वांचीच दैना होत आहे.

बोर्ली-मांडला : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. रात्रंदिवस पावसाचा जोर असून यामुळे सर्वांचीच दैना होत आहे. मुरुड-साळाव राज्य महामार्गावरील रस्त्याच्या साइडपट्ट्यांची काही ठिकाण वाताहत झाल्यामुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळाले असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुरुड तालुक्यातील साळाव-मुरुड रस्त्यावरील मौजे कोलई ग्रामपंचायत हद्दीतील वेलस्पन कंपनीच्या जेटीनजीक संरक्षित भिंत खचली. तसेच भोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मौजे बाराशिव गावच्या हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या संरक्षित भिंतीजवळ दोन ते तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने तेथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोलई बोर्लीमधील चढणीच्या वळणावर असणाऱ्या मोरीवर संरक्षित भिंतीला कठडा नसल्याने या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच साळाव पोलीस तपास नाक्यानजीक सार्वजनिक बांधकाम विभागाने डोंगरातून येणारे पाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था न केल्याने या डोंगरातून येणारे पाणी रस्त्यावरून वाहत समुद्रात जात आहे. त्या ठिकाणी दुचाकी गाड्या घसरून वाहनचालक जखमी होण्याच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुरुडच्या विभागीय कार्यालयाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. चिकणी ते दांडादरम्यान असणाऱ्या चढणीवरील डोंगराचा काही भाग कधीही कोसळून रस्त्यावर येऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे तसेच संरक्षित भिंतीचे नुकसान केले आहे. तरी आम्ही आमच्याकडे असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे त्यावर योग्य ती काळजी घेऊन काम करणार आहोत. यासाठी वाहनचालकांनी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य करावे. - प्रभाकर जाधव, उपअभियंता मुरुड उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग.