- नितीन जगतापमुंबई : दोन आठवडाभर काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासून हजेरी लावली. संततधारेचा उपनगरीय लोकल सेवांना आणि दहीहांडी फोडण्यासाठी बाहेर पडलेल्या गोविंदा पथकाला फटका बसला. तिन्ही मार्गांवरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने दहीहंडी उत्सव बघायला बाहेर पडलेल्या मुंबईकरांना गर्दीचा सामना करावा लागला. आहे.
संपूर्ण राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला होता. मात्र, गुरुवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने पुनरागमन केले आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील लोकल वाहतूक मंदावली होती. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या जलद लोकल १५ ते २० मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटाने विलंबाने धावत होत्या, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने धावत होत्या.
पावसाचा धारा दिवसभर कोसळत असल्याने आणि हवेतील दृश्यमानता कमी झाल्याने लोकलसह रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाला होता. ठाण्यातील दहीहंडी सहभागी होण्यासाठी मुंबईतून जाणाऱ्या गोविंदा पथकांना लोकल सेवांचा विलंबाचा रस्त्यावरील वाहतूककोंडीचा फटका बसला.
शहर व उपनगरातील अनेक रस्त्यांवर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होत. त्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने वाहतूक मंदावली. हंडी फोडण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गोविंदा पथकांसह इतर नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दहीहंडी असलेल्या परिसरातील काही मार्गिका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकेरी वाहतूक किंवा मार्ग बंद असल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू होती. मुंबईत पावसामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला.
पूर्व मुक्त मार्ग, सी लिंक गेटवर, अंधेरी सबवेवर, सांताक्रूझ पूर्व रेल्वेस्थानक बस डेपोवर, चेंबूर, कुर्ला, मानखुर्द रेल्वेपूल स्लीप रोडवर, विक्रोळी, घाटकोपर फातिमा हायस्कूल, दादर टीटी जंक्शनवर, खार रेल्वेस्थानकाजवळ, गमडिया जंक्शन, महालक्ष्मी जंक्शन येथे वाहतूक मंदावली होती. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. लवकर घरी पोहोचता यावे, म्हणून प्रवासी बस आणि रेल्वेपेक्षा रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात; परंतु याचा गैरफायदा टॅक्सीचालक घेत असून, अवाच्या सव्वा भाड्याची मागणी करत आहेत. त्याविरोधात प्रवाशांनी कारवाईची मागणी केली.
वाहतुकीत बदल दहीहंडी उत्सवासाठी काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. याचा परिणाम बेस्टच्या बसवर झाला. परिणामी, अप आणि डाउनच्या काही बस शॉर्ट ट्रिप करण्यात आल्या, तर भायखळा, ग्रॅन्ट रोड, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड आदी मार्गांवर धावणाऱ्या बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यात प्रवाशांचा बराच वेळ वाया गेला.