जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

By admin | Published: June 13, 2015 11:21 PM2015-06-13T23:21:08+5:302015-06-13T23:21:08+5:30

जिल्ह्यात पाऊस स्थिरावण्याची चिन्हे दिसत असून शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण १२१.१० मिमी पावसाची नोंद झाली

The rain increased in the district | जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Next

अलिबाग : गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पाऊस स्थिरावण्याची चिन्हे दिसत असून शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण १२१.१० मिमी पावसाची नोंद झाली असून त्यातील जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नोंद श्रीवर्धन येथे झाली आहे. गतवर्षी १३ जून अखेर जिल्ह्यात सरासरी २.६३ मिमी म्हणजे ४२ मिमी पाऊस झाला होता, तर यंदा १३ जूनअखेर हे सरासरी पर्जन्यमान वाढून ७.५७ होऊन एकूण पाऊस १२१.१० मिमी झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील १३ जून अखेरचे पर्जन्यमान श्रीवर्धन-४१, म्हसळा-२४, मुरुड-१२, माणगाव-९, तळा-७, अलिबाग-६, पोलादपूर-६, रोहा-३, पनवेल-४, पेण-२.१०, महाड-२, सुधागड-१, माथेरान-४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस अशाच प्रकारे स्थिरावत गेला तर पेरण्यांना हा पाऊस फायद्याचा ठरेल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो आहे.
रोहा : पावसाच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असताना शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. वरुण राजाच्या पहिल्या हजेरीतच महावितरणने आपल्या मर्यादा स्पष्ट करीत सालाबादप्रमाणे न चुकता खंडित होण्याची परंपरा कायम राखली. तर दुसरीकडे शहरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले. याशिवाय डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
वैशाख वणव्यात उकड्याने सर्वजण हैराण झालेले होते. लग्नसराई, उन्हाचे चटके, उकड्याने अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा व त्यातच लग्नसराईमुळे आर्थिक चणचणीत सापडलेला रोहेकर पुरता हैराण झाला होता. तो वाट पाहत होता पावसाची. अखेर त्यानेही हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिलाच.
पावसाच्या आगमनामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे घामाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरु असून त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील रस्ते खड्डेमय असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
पहिल्याच पावसाच्या हजेरीने वीज मंडळाची यंत्रणा कोलमडली असून वीज गेल्याने अनेकांची धावपळ झाली, तर पहिल्याच पावसात वीज मंडळाच्या कामाची पोचपावती मिळाल्याने वीज मंडळाने उर्वरित दिवसात विद्युत पुरवठा चांगल्याप्रकारे सुरु राहील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. रोहा शहरात सध्या घाणीचे सामाज्य पसरले असून त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: The rain increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.