मुंबई : मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. ३० डिसेंबर रोजीही या ठिकाणी पाऊस पडणार असून, दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. १ डिसेंबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असेल.
गेल्या २४ तासात राज्यभरात हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून, बहुतांश ठिकाणी किमान तापमानात देखील वाढ नोंदविण्यात आली आहे. तर कुलाबा, माझगाव आणि मालाड येथील हवा शनिवारीही अत्यंत प्रदूषित नोंदविण्यात आली असून, उर्वरित मुंबईतील हवा मध्यम ते समाधानकारक स्वरूपाची नोंदविण्यात आली आहे.