मुंबईत उद्या पाऊस! हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:05 AM2019-12-22T06:05:28+5:302019-12-22T06:05:43+5:30
हवामान विभागाचा अंदाज । राज्यात सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची चंद्रपूरमध्ये नोंद
मुंबई : राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २१.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्याचे किमान तापमान सरासरी नोंदविण्यात येत असतानाच हवामानातील बदलामुळे राज्यात बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला असून, शनिवारी संपूर्ण दिवस मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले आहे. विशेषत: ढगाळ हवामानामुळे आता मुंबई शहर आणि उपनगरालादेखील सोमवारी अत्यल्प स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात, कोकण, गोव्याच्या काही भागात, तर मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान हे सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मुंबईचा विचार करता शनिवारी सकाळी काही काळ मुंबईकरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यानंतर मात्र सकाळसह दुपारी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात बराच काळ ढगाळ वातावरणाचा अनुभव मुंबईकरांना आला. मुंबईत रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, सोमवारी शहर, उपनगरात अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्ययात आली आहे.
आकाश ढगाळ राहणार
च्२२ डिसेंबर : आकाश अंशत: ढगाळ राहील.
च्२३ डिसेंबर : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यासाठी अंदाज
२२ डिसेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील.
२३ डिसेंबर : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
२४ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
२५ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
महत्त्वाच्या शहरांचे शनिवारचे किमान तापमान
पुणे १५.९
अहमदनगर १४.६
महाबळेश्वर १४
नाशिक १५.१
सातारा १५.९
औरंगाबाद १४.२
परभणी १४.६
नांदेड १५
अमरावती १५.४
चंद्रपूर १०.६
गोंदिया १२.८
नागपूर १३.१
वाशिम १५
वर्धा १५.४