Join us  

Rain News: यंदा सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चे चटके! सरासरीपेक्षा अधिक पावसाचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 9:24 AM

Rain News: राज्यातील काही जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (१०९ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (१०९ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. अधिक आर्द्रतेमुळे दिवसाचे वातावरण अधिक जाचक ठरण्याची शक्यता आहे.

संपूर्ण खान्देश, अहमदनगर, सांगली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे व दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नांदगाव, येवला, वैजापूर ते सिल्लोडपर्यंतच्या तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. 

सप्टेंबर महिन्यात पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेपर्यंत कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता ८० टक्के आहे. थोडक्यात सप्टेंबर महिन्यात कमाल तापमान अधिक असणार आहे. 

शिवाय पहाटे ५ पर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता ४० टक्के आहे. थोडक्यात किमान तापमान कमी असेल. यामुळे रात्री थंडी जाणवेल तर भल्या पहाटे दव जास्त पडेल.

ला-निना यावर्षी अखेरपर्यंत पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे पावसाचा प्रभाव जाणवला व तो डिसेंबरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता जाणवते; त्या ठिकाणी खरीप पिकांचे, भाजीपाल्याचे काढणीदरम्यान कदाचित सप्टेंबरच्या अधिक पावसामुळे अडचण जाणवू शकते.- माणिकराव खुळे, माजी अधिकारी, हवामान खाते

टॅग्स :पाऊस