- शेफाली परब-पंडितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने उद्या, ७ मार्चला होणाऱ्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत पाच हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने जास्तीत जास्त प्रकल्प मंजूर करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची घाई सुरू आहे. मुंबईकर मतदारांना खूष करण्यासाठी शेवटच्या सभेत जास्तीत जास्त कामे मंजूर करण्यावर भर दिला जाणार आहे. मागील बैठकीत साडेतीन हजार कोटींपर्यंतच्या ९५ प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला नव्हता. आता आणखी दोन हजार कोटींपर्यंतचे नवीन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. यात नाले आणि रस्ते दुरुस्ती, मलबार हिल जलाशय, रुग्णालयांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रस्तावांना अखेरच्या बैठकीत मंजुरी मिळेल का? याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या सभागृहाची मुदत ७ मार्चला संपुष्टात येत असली, तरी अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पालिकेचा कारभार यापुढे प्रशासकाच्या हाती जाणार आहे. पालिकेच्या विविध नागरी व विकासकामांसाठी स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक असते. सभागृहाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी कामांना मंजुरी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीत स्थायी समितीपुढे १८० प्रस्ताव सादर करण्यात आले होते. भाजपने विरोध केल्यामुळे यातील ९५ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. सोमवारच्या स्थायी समितीत १६० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात नालेदुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे, खोलीकरण, पेटिका नाल्यांची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती अशा कामांचाही समावेश आहे. पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
मंगळवारपासून प्रशासकनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याने ८ मार्चपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार आहे. सोमवारची स्थायी समितीची बैठक अखेरची आहे. त्यानंतर महापौरांना पालिकेचे वाहन, बंगला, कर्मचारी, कार्यालय हे सर्व लाभ सोडावे लागणार आहेत. तसेच पालिकेच्या वैधानिक व विशेष समित्या, प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांनाही प्रशासनाकडून उपलब्ध झालेली वाहने जमा करावी लागणार आहेत.
nपर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण : ३९४ कोटी २१ लाख nपवई- घाटकोपर जलाशय बोगद्यासाठी : ५१५ कोटी nकांदिवली शताब्दी रुग्णालय : ४३२ कोटीnनाहूर सुपरस्पेशालिटी रुग्णालय : ६७० कोटीnनायर रुग्णालयाचा विस्तार : २९६ कोटी nअग्निशमन दल प्रस्ताव : १२६ कोटी nमलनि:सारण वाहिन्या : ८० कोटी nमलबार हिल टेकडी जलाशय : ५८९ कोटी