मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, हा जोर मुंबईमध्ये तरी आता ओसरल्याचे चित्र दिसून येते. तसेच सकाळपासून ठप्प झालेली मध्य रेल्वेची ठाणे ते कल्याण अप व डाउन मार्गावरील ट्रेन धीम्या गतीने सुरु झाली आहेत.
तसेच शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.
पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मिठी नदीची पातळी वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील याचा फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील एक्सप्रेस सेवांवर परिणाम झाला आहे. मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या वळविण्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरही वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर वांद्रे-वापी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.