मुंबई : रविवारी पावसाने मुंबईत विश्रांती घेतली असली तरी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत तुरळक ठिकाणी कोसळलेल्या पावसाची ४० ते ७० मिलीमीटर एवढी नोंद झाली. येत्या २४ तासांसाठी मुंबईसह ठाण्यात अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह लगतच्या परिसरात मान्सून सक्रीय असतानाच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातदेखील मान्सून सक्रीय राहील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबापुरीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असतानाच थोडीशी मोकळीक म्हणून पावसानेदेखील रविवारी विश्रांती घेतली. रविवारी सकाळी किंचित कोसळलेल्या जलधारा वगळता दुपारी पाऊस ब-यापैकी उघडला होता. शिवाय सुर्यनारायणाचे दर्शन झाल्याने ठिकठिकाणी ऊनं पडल्याने मुंबईकर देखील घराबाहेर पडले होते. दुपारप्रमाणे नंतर देखील पावसाची विश्रांती कायम होती. त्यामुळे पावसाने साथ दिल्याने श्री गणेशाचे दर्शन करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडला होता. आणि यावेळी सामाजिक अंतराचे नियम पाळले जात होते.
रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी ६ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ११ ठिकाणी झाडे कोसळली. ४ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. कुर्ला पश्चिम येथील पत्रा चाळीत शनिवारी दुपारी १ च्या सुमारास तळमजला अधिक घराच्या पोटमाळ्याचा भाग कोसळला. यात महिला जखमी झाली. तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविता आढांगळे असे जखमी महिलेचे नाव असून, तिची प्रकृती स्थिर आहे.