लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. रविवारी दिवसभर पाऊस विश्रांतीवर हाेता, संध्याकाळी मात्र पावसाची रिमझिम हाेती. सोमवारीही पाऊस असाच थांबून थांबून पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात मात्र किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र कायम आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. २१ जूनला कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
..............................