पावसाची विश्रांती; पडझड कायम, बांधकामाचा भाग काेसळून ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:55+5:302021-06-19T04:05:55+5:30
घाटकाेपरमध्ये बांधकामाचा भाग काेसळून ३ जखमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह उपनगराला गुरुवारी झोडपणाऱ्या पावसाने शुक्रवारी सुट्टी घेतली. ...
घाटकाेपरमध्ये बांधकामाचा भाग काेसळून ३ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह उपनगराला गुरुवारी झोडपणाऱ्या पावसाने शुक्रवारी सुट्टी घेतली. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी मुंबापुरीवर पावसाचे ढग दाटून आले हाेते. मात्र, प्रत्येक वेळी ढगांनी हुलकावणीच दिली. कुठे तरी रिमझिम सुरू असली तरी त्याचे प्रमाण सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी होते. दरम्यान, घाटकोपर येथे बांधकामाचा भाग कोसळून ३ जण जखमी झाले.
मुंबई महापालिकेकडील पावसाच्या नोंदीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे ८३.३ मिमी पाऊस कोसळला. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. मावळतीला पुन्हा पावसाच्या ढगांनी गर्दी केली. मात्र, पाऊस गायब हाेता. दरम्यान, ११ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला, तर ७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
घाटकोपर येथे चिरागनगर पोलीस ठाण्याजवळ तळमजला अधिक एक माळ्याच्या चाळीचा भाग गुरुवारी मध्यरात्री १.३८च्या सुमारास बाहेरच्या बाजूस पडून तीन लोक जखमी झाले. राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
.............................................