मुंबई : रविवारी सकाळच्या साडे आठच्या नोंदीनुसार मुंबईत १८ मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून, मान्सूनदरम्यान पडझडीच्या घटनाही घडत आहेत. रविवारी ५ ठिकाणी घरांचा भाग पडला आहे. २६ ठिकाणी झाडे पडली. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. जुना डोंगरी येथे वास्तव्यास असलेले अब्दुल करीम मीया महाबळेश्वरवाले (४२) यांचा मृतदेह ६ ऑगस्ट रोजी एस.व्ही.पी. रोड, खेतवाडी येथे सापडल्याची माहिती शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता पोलीसांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली. जे.जे रुग्णालयात सदर मृतदेह नेल्यावर शवविच्छेदन अहवालात ही व्यक्ती बुडून मृत्यू पावल्याची माहिती मिळाली. दरम्यान, १० आणि ११ ऑगस्टपासून मुंबईसह पश्चिम किना-यावर मान्सून सक्रिय होईल. शिवाय आठवडाभर मान्सून सक्रीय असण्याची स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.