मुंबई : रविवारी सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही हवामान केंद्रावर ०.० मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाने उघडीप घेतल्याने मुंबईकरांचा रविवार संपुर्णत: कोरडा गेला आहे. दरम्यान, सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसानंतर हवामानात अचानक बदल झाले; आणि कोरड्या झालेल्या वातावरणाने मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’ दिला.पावसाने उघडीप घेतली असली तरीदेखील मुंबईत ३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून, सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सर्वसाधारण ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मराठवाड्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यात हवामान कोरडे राहील. २९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ३० सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.