Join us

पावसाची विश्रांती; आज सरींची शक्यता : मुंबई प्रादेशिक हवामान खातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:39 AM

मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. कुठे तरी पावसाची तुरळक हजेरी लागत असली तरी हे प्रमाणही कमी आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. कुठे तरी पावसाची तुरळक हजेरी लागत असली तरी हे प्रमाणही कमी आहे. परिणामी मुंबईत ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, पावसाने उघडीप घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात काही हलक्या/तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे २५.८, १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात दोन, पूर्व उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनांत हानी झाली नाही. तर भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.