पावसाने मुंबई सुस्तावली; खड्डे, तुंबलेले पाणी आणि संततधारेने ठिकठिकाणी काेंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:31 AM2023-07-28T11:31:34+5:302023-07-28T11:31:48+5:30
गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीसह गुरुवारी दिवसभर मुंबईकरांना जोरदार दणका दिला.
मुंबई : गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीसह गुरुवारी दिवसभर मुंबईकरांना जोरदार दणका दिला. विशेषत: उपनगरात जोरदार बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी मात्र संपूर्ण मुंबईत धुवाधार बरसात केली आणि रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतूक पुन्हा एकदा कोलमडली. हवामान खात्याकडून सातत्याने मिळणाऱ्या इशाऱ्यामुळे गुरुवारी बहुतांशी मुंबईकरांनी वर्क फ्रॉम होम केले; तर कार्यालय गाठलेल्या चाकरमान्यांची पावले भर दुपारीच घराकडे वळल्याचे चित्र होते. एकंदर रस्त्यांवरील खड्डे, सखल भागात साचलेले पाणी आणि रेकॉर्ड ब्रेक करत असलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत अघोषित बंद पुकारल्याचे चित्र होते.
पावसाचे पाणी काेठे साचले ?
बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली होती. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली होती.
लाल बहादूर शास्त्री मार्गावर नेहमीप्रमाणे शीतल आणि कल्पना सिनेमा परिसरात साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
कुलाबा आणि चर्चगेट परिसरातही पावसाचे पाणी साचले होते. त्याच पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागत होती.
सांताक्रूझ १४५
कुलाबा २२३
वांद्रे १०६
नरिमन पॉइंट १७१
मलबार हिल १३२
ग्रँट रोड १२८
मेमनवाडा १२६
दादर ११४
परेल १०५
विक्रोळी १२९
भांडूप १२५
कुर्ला ११८
मुलुंड ११२
मरोळ १५९
अंधेरी १५४
जोगेश्वरी १४७
वर्सोवा १४०
मालवणी १२९
गोरेगाव १२४
विलेपार्ले ११७
कांदिवली ११४
राम मंदिर १६१
भायखळा ११९
फोर्ट १५३
माटुंगा ७८
दहिसर पूर्वेकडील पायल हॉटेल जंक्शन येथे ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद होती.
अंधेरी सब वे येथे ३ फूट पाणी साचल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद पडली होती. वाहतूक एस.व्ही. रोडवरून वळविण्यात आली होती.
पोईसर, समता नगर येथे ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद होती.आझाद मैदान, काळबादेवी, माटुंगा, भायखळा, डी.एन.नगर, ओशिवरा, कांदिवली, दहिसर या परिसरात वाहतूक संथ गतीने सुरु होती.
गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पूर्व उपनगरात बीकेसी, कुर्ला, सायन, विद्याविहार, साकीनाका आणि घाटकोपर परिसरात पावसाचा जोर कायम होता.
दुपारी २ ते ४ दरम्यान वरळी, प्रभादेवी, लालबाग, चिंचपोकळी, करीरोड, महालक्ष्मी या परिसरात वाऱ्यासह वेगाने दाखल झालेल्या पावसाने घर गाठणाऱ्या चाकरमान्यांचा रस्ता अडविला.