मुंबई : सलग आठवडाभर मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढणाऱ्या पावसाने शनिवारी उघडीप घेतली. मुंबई काही ठिकाणी अगदीच सरीवर सरी कोसळत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी होते. मुंबईत बहुतांश ठिकाणी ऊनं पडल्याने आठवड्याभराने मुंबईकरांना मोकळीक मिळाल्याचे चित्र होते. रविवारीदेखील पाऊस उघडीप घेणार आहे.
शनिवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. अनेक दिवसांनी मुंबईकरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. सकाळी ११ आणि दुपारी २च्या सुमारास काही ठिकाणी किंचित सरीवर सरी कोसळल्या. उर्वरित काळात काहीवेळ मुंबईवर ढग दाटून आले होते. तर काही वेळ ऊन पडले होते. मुंबईत अवघ्या ५.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी पडझडीच्या घटना घडतच आहेत. मुंबईत आठ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. नऊ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
गोवंडी येथील घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण चौदा जण जखमी झाले होते. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित दहा जणांवर सायन, राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दहापैकी सहाजण रुग्णालयात दाखल असून, त्याची प्रकृती स्थिर आहे, तर चार जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे.