पावसानेही घेतली रविवारची सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:17 AM2019-07-08T06:17:44+5:302019-07-08T06:18:12+5:30

४१.३ मिमी पावसाची नोंद; २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Rain stopped on Sunday like holiday | पावसानेही घेतली रविवारची सुट्टी

पावसानेही घेतली रविवारची सुट्टी

Next

मुंबई : रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईत ४१.३ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सकाळपासून मुंबईत थांबून थांबून पाऊस पडत असला तरी येत्या २४ तासांसाठी उत्तर कोकणाला हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.


भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८, ९ आणि १० जुलै रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. रविवारी सकाळपासूनच मुंबईत पाऊस विश्रांतीवर होता. कुठे तरी पडलेली मोठी सर वगळता दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई रोजच्या पावसाच्या मानाने कोरडीच होती. मुंबईत ८ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला, ३७ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. ५९ ठिकाणी झाडे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.


समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात बुडालेल्या साईल खान (१२) या मुलाचा मृतदेह रविवारी पोलिसांच्या हाती लागला. शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास तो भरतीच्या वेळी उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी मित्रांसोबत गेला. तेथेच तोल जाऊन तो पडला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच जावेद खान (२२) याने त्याला वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. पण साईलला वाचविताना तोच पाण्यात बुडाला. सायंकाळी उशिरा जावेदचा मृतदेह हाती लागला. त्यापाठोपाठ रविवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी साडेआठच्या सुमारास साईलचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: Rain stopped on Sunday like holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.