Rain Update ( Marathi News ) : कालपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढचे आणखी चार दिवस जोरदार पाऊस असणार आहे, मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या भागात ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
रेल्वेवरही परिणाम
महाराष्ट्रातील कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे प्रवासाचे मार्ग लहान करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विस्कळीत झाल्यानंतर कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मर्यादित वेगाने वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, वासिंद-खर्डी सेक्शनवर पहाटे ३ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ट्रॅकच्या तटबंदीचे नुकसान झाले, 'ओव्हरहेड इक्विपमेंट' खांब वाकला आणि एक झाड उन्मळून पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-कसारा दरम्यानची वाहतूक मर्यादित वेगाने पूर्ववत करण्यात आली आहे.
"ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्यामध्ये 16345 LTT-थिरुवनंतपुरम एक्सप्रेस, 12289 CSMT-नागपूर दुरंतो एक्सप्रेस आणि 12145 LTT-पुरी SF एक्सप्रेसचा समावेश आहे. ट्रेन क्रमांक 20705 जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आणि मनमाड-सीएसएमटी सुपर फास्ट एक्सप्रेसचा प्रवास गंतव्यस्थानापूर्वी इगतपुरी येथे थांबवण्यात आली आहे.