Rain Update in Maharashtra: राज्यात अतिवृष्टीचा इशारा; वारकऱ्यांनाही पावसाचा फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:09 PM2022-07-06T17:09:52+5:302022-07-06T17:10:27+5:30
Rain Update in Maharashtra: मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील चार ते पाच मान्सून सक्रीय राहील. पंढरी वारीच्या उत्तर्धातील शेवटच्या टप्प्यातही वारकऱ्यांनाही कदाचित या ५ दिवसात काहीशा मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यताही आहे.
मुंबई : मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील चार ते पाच मान्सून सक्रीय राहील; आणि त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पंढरी वारीच्या उत्तर्धातील शेवटच्या टप्प्यातही वारकऱ्यांनाही कदाचित या ५ दिवसात काहीशा मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यताही आहे.
गुजरातच्या कच्छ क्षेत्रातील अंदाजे राजकोट शहर व आसपास भू-भागावरील जमिनीपासून उंच आकाशात ६ किमीपर्यंत तयार झालेले कमी दाबाचे व्यापक क्षेत्र व त्याच्याशी निगडीत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती, अरबी समुद्रात समुद्र पाणी पातळीत दक्षिण गुजरात ते संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी दरम्यान दक्षिणोत्तर अशा अंदाजे १ हजार किमी लांबीच्या हवेच्या कमी दाबाची तटीय द्रोणीय स्थिती यामुळे हा पाऊस पडत आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. महाराष्ट्राबरोबरच सभोवातालच्या गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक तसेच उत्तराखंड व केरळ राज्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
अतिवृष्टीची नोंद
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात किनारपटटी ते कर्नाटक किनारपटटीपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे.
मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रीय राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग
७ जुलै
रेड अलर्ट / अतिवृष्टी : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
ऑरेंज अलर्ट / मुसळधार ते अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, चंद्रपूर
८ जुलै
रेड अलर्ट / अतिवृष्टी : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
ऑरेंज अलर्ट / मुसळधार ते अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक
९ जुलै
रेड अलर्ट / अतिवृष्टी : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर
ऑरेंज अलर्ट / मुसळधार ते अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा