Join us

Rain Update: मुंबई, नवी मुंबई, ठाणेकर पावसाच्या सरींनी सुखावले; हार्बर रेल्वेसेवा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 9:10 PM

गुरुवारी रात्री पावसाने विविध भागात दमदार हजेरी लावली. यावेळी ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होत होता.

मुंबई -  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहर व उपनगरासह राज्यातील ठिकठिकाणी पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत विविध जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या परिसरातही पाऊन कोसळला. त्यामुळे या भागात वीज पुरवठा खंडीत झाला.  

गुरुवारी रात्री पावसाने विविध भागात दमदार हजेरी लावली. यावेळी ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होत होता. अचानक आलेल्या पावसाने मात्र काम धंद्याला गेलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. बहुतांशी चाकरमान्यांना दुकानाच्या बाजूला किंवा उड्डाणपूल तसेच मिळेल त्या ठिकाणी आडोसा शोधताना दिसून आले. तसेच रिक्षा पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. 

ठाण्यातही वरूणराजाची हजेरीसंध्याकाळ नंतर ठाणे शहरात मेघ दाटून आले होते. पावसाचे आगमन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ठाण्यात पावसाला सुरुवात झाली. या पहिल्या पावसात नाहून निघताना एक आंनद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाला. पावसामुळे वाहनांचा वेग ही मंदावला होता. 

उल्हासनगरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरीउल्हासनगरात गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारे वाहू लागून विजेच्या कडकडाट पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाने व वाऱ्याने अनेक झाडे कोलमडली असून घराचे पत्रे उडून गेल्याची घटना घडल्या आहेत. तर वीज गुल झाल्याने, सर्वत्र अंधार पसरला होता. तसेच तुंबलेल्या नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने, सर्वत्र पाणी व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून अनेकांनी पहिल्या पावसाचा आनंद लुटत पावसात भिजत असल्याचे चित्र शहरात होते.

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत वाशी-सानपाडा दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. पनवेल ते जुईनगर आणि ट्रान्स हार्बर सेवा मात्र सुरळीत सुरू होत्या. 

चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळलीनाशिक येथे जनावरांना चारा आणण्यासाठी रानात गेलेली महिला चारा घेऊन घराकडे परतत असताना गुरूवारी (दि.९) वाटेतच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामुळे भाजलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सविता बाळासाहेब गोडसे (३९,रा.संसरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मान्सुनपुर्व वादळी पावसाने महिलेच्या रुपाने हा पहिला बळी घेतला. 

टॅग्स :पाऊस