मुंबई: मुंबईत 13 आणि 14 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय कोकण आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच आज मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील सायक्लॉनिक सर्क्युलेशन कमकुवत झाल्याने अलर्ट बदलवण्यात आला आहे. ज्यात मुख्य: पावसाचा अधिकतम पट्टा हा मुंबईच्या दक्षिणेत सरकल्याने रायगड आणि रत्नागिरीत अतितीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, असं जरी असलं तरी आज मुंबई आणि उपनगरात तीव्र पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम ठेवण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे 5 नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे. काल दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या मुळसळधारा कोसळत होत्या. त्यामुळे नदी-नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. शिवाय समुद्राच्या लाटा देखील किनाऱ्याला वेगाने धडकत होत्या.
सोमवारपर्यंत रत्नागिरीत रेड अलर्ट असून सध्याचे वातावरण हे पाऊस पूरक असंच आहे. जिल्ह्यात NDRF च्या चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा सारासार विचार करता अद्याप तरी संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत नाहीय. पण काही भागातील वातावरण पाहता पुढील काही तासात वरुण राजा जोरदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे.