कोकण अन् मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा; मुंबईसह राज्यभर उन्हाचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:08 AM2022-03-25T10:08:11+5:302022-03-25T10:08:38+5:30
मुंबई : मुंबईसह राज्यभरात उन्हाचे चटके बसत असतानाच ढगाळ हवामानानेही काही ठिकाणांना कवेत घेतले आहे. काही ठिकाणी तर अवकाळी ...
मुंबई : मुंबईसह राज्यभरात उन्हाचे चटके बसत असतानाच ढगाळ हवामानानेही काही ठिकाणांना कवेत घेतले आहे. काही ठिकाणी तर अवकाळी पावसाचा शिडकावा होत आहे. पुढील ४८ तासदेखील असेच वातावरण राहणार असून, २५ मार्च रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मुंबई ३५.३ अंश
गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.३ अंश एवढे नोंद झाले आहे, तर किमान तापमानाची नोंद २५.४ अंश झाली आहे. गेल्या तीनएक दिवसांपासून मुंबईचे हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे. बुधवारी मात्र ढगाळ हवामान विरल्यानंतर मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले होते. गुरुवारी पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानाची नोंद ३५ अंश झाली.