पाऊस लांबला; २१ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 04:41 PM2020-10-17T16:41:15+5:302020-10-17T16:41:37+5:30
Mumbai Monsoon : पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत
मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईसह राज्यात कोसळणा-या पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्याप मान्सून मुंबईतून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली नाही. परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असून, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला लेटर्माक लागला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू का होईना ओसरत असतानाच हवामानात झालेल्या बदलामुळे राज्यभरात पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत तरी असणार आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या खाडीत सातत्याने हवामानात बदल होत आहे. या बदलाचा परिणाम म्हणून पावसाचा जोर आणखी काही दिवस राहणार आहे. त्यानुसार, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कोकण, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईचा विचार करता गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सातत्याने पावसाचे ढग दाटून येत आहेत. मात्र पाऊस बेपत्ता आहे. शनिवारी दुपारीदेखील मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले होते. मात्र पाऊस बेपत्ता होता. मुंबईत दिवसा ऊनं आणि ढगाळ असे संमिश्र वातावरण असल्याने मुंबईकर ऊकाड्याने हैराण झाले आहेत.
दरम्यान, राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत रहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.