Rain: ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:51 AM2023-06-29T08:51:17+5:302023-06-29T08:51:51+5:30

Rain: गेले तीन दिवस हलका बरसल्यानंतर बुधवारी पहाटेपासून जोर धरलेल्या पावसाच्या सलग पाच ते सात तास कोसळधारांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अक्षरश: दाणादाण उडवून दिली.

Rain: Washed from Thane, Kalyan to Palghar, Navi Mumbai | Rain: ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले

Rain: ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले

googlenewsNext

ठाणे - गेले तीन दिवस हलका बरसल्यानंतर बुधवारी पहाटेपासून जोर धरलेल्या पावसाच्या सलग पाच ते सात तास कोसळधारांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अक्षरश: दाणादाण उडवून दिली. ठाणे, कल्याण, अंबरनाथपासून ते पालघर, नवी मुंबई, कर्जत, कसारा सर्वदूर पाऊस धो धो कोसळला. 
अनेक भागात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचले. त्यामुळे वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत होती. दुकानात, घरात शिरलेले पाणी उपसून बाहेर काढताना रहिवाशांचे अक्षरश: कंबरडे मोडले. दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी दुसरीकडे शहरी भागांतील नागरिकांची मात्र चांगलीच दैना उडाली. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

दमदार पावसाने ठाणेकरांची दाणादाण
सखल भागात पाणी साचल्याने अनेक घरे, दुकानांत पाणी शिरले. रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने पण उशिरा सुरू होती. केवळ ठाणे शहरात पाच तासांत १०५ मि. मी. पाऊस झाला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांतही १०० मि.मी. व त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्याचा अंदाज आहे.  झाडांच्या पडझडीमुळे काही भागात वाहनांचे नुकसान झाले.  ग्रामीण भागात कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडल्या नसल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आला.  साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या.

उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ
ठाणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत  वाढ होऊ लागली आहे. बदलापूर, मोहाने आणि जांभूळपाडा येथे उल्हास नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

११ ते दुपारी ४ दमदार पाऊस
ठाणे जिल्ह्यात ५१.०२ मिमी पावसाची नोंद झाली. मुळात खरा दमदार पाऊस बुधवारी सकाळी ११ ते दुपारी चार या वेळात झाला. जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आदी भागांत झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. रेल्वे रुळांवर  पाणी साचले.

१० ते १५ मिनिटे लोकल उशिरा
लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकामध्ये तोबा गर्दी झाली होती. दरम्यान, कल्याण तालुक्यात ५५ मिमी, मुरबाडमध्ये ५४.३ मिमी, भिवंडी ६२.४ मिमी, शहापूर तालुक्यात ७०.६ मिमी, उल्हासनगरात ४३.०० मिमी तसेच अंबरनाथ मध्ये ४९.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

संरक्षक भिंत कोसळली
 नवी मुंबई : पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. विविध ठिकाणी वृक्ष कोसळले असून, बाजार समितीमध्ये आवकही कमी झाली आहे.  सकाळी ८:३० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत शहरात सरासरी ८८.९२ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस दिघा येथे १४८ मिमी इतका झाला आहे. 
पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये बुधवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. नवी मुंबईमध्ये एनआरआय सोसायटीमधील संरक्षक भिंत कोसळून तीन कारचे नुकसान झाले. मुंबई बाजार समितीमध्ये फक्त २४२४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आवक कमी झाल्यामुळे अनेक भाज्यांच्या किमती १०० च्या पुढे गेल्या आहेत. पनवेल परिसरातील पांडवकडा व इतर धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मुसळधार पावसामुळे महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपत्कालीन विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आंबेनळी घाट बंद; ताम्हिणी घाटाचा पर्याय
 पोलादपूर :  पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काळकाई मंदिराजवळ शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. यामुळे रात्री वाहने दोन्ही बाजूला अडकून पडली होती. प्रशासनाने मदतकार्य हाती घेत रस्त्यावरील ही दरड सकाळपर्यंत हटविली. मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून ताह्मिणी घाटातून वाहनचालकांना मार्गस्थ होता येणार आहे. 
सकाळी ही दरड बाजूला करून अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या मदतकार्यात नरवीर रेस्क्यू टीम व प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनीही मोलाची मदत केली. दरम्यान, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अद्याप या रस्त्यावर वाहतूक सुरू करण्यात आली नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर प्रभारी उपअभियंता अमृत पाटील यांनी दिली. '
पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉइंटजवळ दरड कोसळली होती. दरड हटविण्यात आली आहे. मात्र, आंबेनळी घाट  दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला आहे. प्रवाशांनी, ताम्हणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा.     - - सोमनाथ घार्गे
पोलिस अधीक्षक, रायगड

धडकी भरवणारा पाऊस
 पालघर : पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून मुंबई - अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे पाऊस आणि वारे यामुळे उधाणाच्या लाटा धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला धडका देऊ लागल्याने किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी ६५.६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण ६८५.१९ मिलीमीटरपाऊस झाला आहे.
डहाणूच्या गंजाड, मासवण येथे मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवेचा माती भराव जोरदार पावसामुळे खचला असून रस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या शेतात गेला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील दापचारी व आरटीओ चेक पोस्ट येथील राज्य सीमाशुल्क नाक्यावरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाली असून चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६८५.१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Rain: Washed from Thane, Kalyan to Palghar, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.