मुंबई : मान्सून आपला पॅटर्न बदलत असून, जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा जूनच्या शेवटी, जुलैमध्ये दोनवेळा, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी एकदा, असे किमान चार वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. या चार ते पाच पावसांमुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करतानाच हवामानातील बदलावर मोठ्या पावसाचे गणित विसंबून असते. त्यामुळे मान्सून जसा पुढे सरकेल तसे चित्र आणखी स्पष्ट होईल, याकडेही हवामान अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.
मुंबईत एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसांत कोसळतो. दरवर्षी सहा वेळा मुसळधार, पाच वेळा अतिमुसळधार पाऊस पडतो. तसेच वर्षांतून चार दिवस अतिवृष्टी होते. मुंबईत समुद्र सपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते.
दर सहा तासांनी अंदाज -
भारतीय हवामानशास्त्र विभाग हा ढगफुटी शब्द वापरत नाही. अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार, अशी त्याची शास्त्रीय व्याख्या केली जाते. ढगफुटी होईल, असा अंदाज दिला जात नाही. पुढील २४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती रडारद्वारे मिळते. मुंबईत २४ आणि ४८ तासांसोबत आता दर सहा तासांचे पूर्वानुमान दिले जाते. मोठे बदल असतील, तर दर तीन तासांनी अंदाज वर्तविले जातात, असे सांगण्यात आले.
गेल्या पाच-सात वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. अतिवृष्टीची अनेक कारणे असतात, परंतु जेव्हा तीव्र ट्रफ, बंगालच्या उपसागरातील मान्सूनचे कमी दाबाचे क्षेत्र आणि जोरदार मान्सून लाट, अशा अनेक परिस्थिती उद्भवतात तेव्हा मोठे पाऊस होतात. २० जूननंतर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जुलैमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे. जुलैमध्ये किमान २-३ वेळा अतिमुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होऊ शकते. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक
मुंबईत अलीकडे पूर्वीसारखा अधिक तीव्रतेचा पाऊस होताना जाणवत नाही. त्यामुळे सरासरी पावसाचे दिवस कमी झाले आहेत. जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस धुमाकूळ घालतो व पूर-परिस्थिती निर्माण होते. मुंबईच्या अतिवृष्टी पावसाचा उगाच बाऊ केला जात आहे. पूर्वीच्या पिढीतील लोकांना याची सवय होती. अतिवृष्टीच्या पाण्याच्या निचरा होण्याच्या मार्गांवरील अतिक्रमण व तसेच तयार केलेले कृत्रिम अरुंद ड्रेनेज रुपी मार्ग निसर्गाला मान्य नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पूर- परिस्थिती तयार होत आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
वार्षिक सरासरी-
१) कुलाबा :२२१.३ सेमी
२) सांताक्रुझ :२५०.२ सेमी
३६५ दिवसांपैकी प्रत्यक्षातील एकूण पावसाचे दिवस ७५ ते ७८. मुंबईची वार्षिक पावसाची सरासरी-२३५.८ सेमी
जुलैमधील पावसाच्या नोंदी -
१) कुलाबा-७६.९ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ९२ सेमी (सरासरी)
यंदा ४ ते ७, १८ ते २१ व ३१ जुलैदरम्यान पावसाची शक्यता.
ऑगस्टमधील पावसाच्या नोंदी -
१) कुलाबा - ४७.२ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ५६ सेमी (सरासरी)
यंदा १ ते ४, १५ ते १९, २९, ३०, ३१ ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता.
सप्टेंबरमधील पावसाच्या नोंदी -
१) कुलाबा- ३५.६ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ३८.४ सेमी (सरासरी)
यंदा १, १२ ते १६, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.