पाऊस तर पडणारच; राज्याला अवकाळी पावसाचा इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 05:47 AM2019-12-27T05:47:20+5:302019-12-27T05:47:25+5:30
मुंबईत आकाश ढगाळ; किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज घोषित केला असून, त्यानुसार २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत मध्य भारतासह लगतच्या भागात पाऊस सक्रिय राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाचा काही भागांचा यात समावेश असून, २७ आणि २८ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय येथे अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २२ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गुरुवारी गोंदिया येथे १६.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यासाठी अंदाज
२७-२८ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२९ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, विदर्भात हवामान कोरडे राहील.
३० डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
शहरांचे गुरुवारचे किमान तापमान
सांताक्रुझ २३
अलिबाग २३.८
रत्नागिरी २३.३
डहाणू २१.७
पुणे २१.४
जळगाव १८.२
कोल्हापूर २१.५
महाबळेश्वर १७
मालेगाव १९.२
नाशिक १८.४
मुंबईची हवा वाईटच : मुंबईची हवा गेले काही दिवस वाईट असल्याचे सफर या संस्थेकडून नोंदविण्यात येत आहे. गुरुवारीदेखील मुंबईतील हवा वाईट नोंदविण्यात आली. वांद्रे-कुर्ला संकुल आणि माझगाव येथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. याचप्रमाणे अंधेरी, वरळी, बोरीवली येथील हवेचा दर्जादेखील वाईट असल्याचे नोंदविण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणांवरील हवेचा
दर्जा मध्यम नोंदविण्यात आला.
स्कायमेट काय म्हणते?
आजचा अंदाज
च्ओडिशामध्ये विखुरलेला तर पश्चिम बंगालमध्ये सरी पडण्याची शक्यता आहे.
च्कोलकाता येथे हलका पाऊस पडेल.
च्नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे मध्यम पाऊस पडेल.
च्अरुणाचल प्रदेशातही पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे.
च्झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशचे हवामान कोरडे राहील.
च्पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये धुक्याची शक्यता आहे.
च्कर्नाटकची किनारपट्टी व आसपासच्या भागात विखुरलेला पाऊस पडेल.
च्तामिळनाडू, केरळ आणि कोस्टल आंध्र प्रदेशातही सरी पडण्याची शक्यता आहे.
च्दक्षिण छत्तीसगडमध्ये हलका पाऊस पडेल.