राज्यातील काही भागात आजही पडणार पाऊस, मात्र तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:29 AM2021-12-03T07:29:11+5:302021-12-03T07:29:40+5:30
ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात - उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई : ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात - उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांत पाऊस
३ डिसेंबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद.
४ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक.
मुंबईसह मध्य महाराष्ट्रातही धुके
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारप्रमाणे गुरुवारीदेखील ओलाव्यामुळे धुके निदर्शनास आले असून, शुक्रवारीदेखील येथे धुक्याची चादर कायम राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही धुके जाणवू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.
भारतीय हवामान खात्याचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या चक्रीय वाऱ्यामुळे कमी दाब क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. गोलाकार वारे शांत स्वरूपात समुद्रावरून आर्द्रता भूभागावर ओतत असतात. शांत वाऱ्यामुळे ओतलेल्या आर्द्रतायुक्त हवा विस्कळीत होत नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश रोखला जातो. पर्यायाने उष्णता मिळत नाही. त्यामुळे थंडावा कायम राहतो. परिणामी सांद्रीभवन प्रक्रिया घडून येते. म्हणजेच उंच आकाशात तयार होणारे एकदम प्राथमिक अवस्थेतील ढग जमिनीवरच तयार होतात आणि जमिनीवरच्या या ढगांनाच आपण धुके म्हणतो, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.