लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने बऱ्यापैकी दांडी मारली आहे. कुठेतरी आलेली एक सर किंचित कोसळत असून, नंतर मात्र मुंबईचे आकाश मोकळे होत आहे. सकाळी दाटून आलेले पावसाचे ढग, दुपारी मोकळे झालेले आकाश आणि पुन्हा सायंकाळी ढगांनी केलेली गर्दी; अशा वातावरणाने मुंबई पावसाचे दिवस काढत असून, गेल्या २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळांमध्ये चक्क शून्य पॉइंट शून्य अशा पावसाची नोंद झाली. दरम्यान, अशा वातावरणातही येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पडझड मात्र कायम आहे. २८ जुलै रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास सांताक्रूझ येथील शेलार चाळीत तळमजला अधिक एक मजला असलेल्या राहत्या घराच्या भिंतीचा काही कोसळून ३ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांवर व्ही.एन. देसाई रुग्णालयाचार करत त्यांना सोडण्यात आले. तर एका जखमीस मात्र के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे एकूण ५ ठिकाणी झाडे कोसळली असून, यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.