नाईकांना रोखण्याची ‘राणेनीती’

By admin | Published: January 5, 2015 01:18 AM2015-01-05T01:18:01+5:302015-01-05T01:18:01+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महानगरपालिकेवर २३ वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे

'Raineeta' to prevent Naik | नाईकांना रोखण्याची ‘राणेनीती’

नाईकांना रोखण्याची ‘राणेनीती’

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये नाईकांना रोखण्यासाठी काँगे्रसने नारायण राणे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदार संघात पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. यामुळे पालिका निवडणुकीमध्ये काँगे्रसला उभारी मिळवून देण्याचे आव्हान राणे यांच्यासमोर असणार आहे. तर याच रणनितीवर नवी मुंबई काँग्रेससाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महानगरपालिकेवर २३ वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. पहिल्यांदा शिवसेनेमध्ये नंतर सर्व पक्षांची मोट बांधून व आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता ताब्यात ठेवली आहे. नाईक ज्या पक्षात त्यांचीच सत्ता असे समीकरण राहिले आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. पक्ष कोणताही असो निवडणूक नाईक विरुद्ध सर्व पक्ष अशीच होणार आहे. देशात व राज्यात काँगे्रस बॅकफूटवर गेली आहे. नवी मुंबईमध्येही त्याचा फटका बसला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळविता यावे यासाठी काँगे्रसने पालिकेची जबाबदारी नारायण राणे यांच्यावर सोपविली आहे. राणे यांच्यासमोर नाईकांचे वर्चस्व रोखण्याचे आव्हान आहेच त्यापेक्षा मोठे आव्हान पक्षांतर्गत गटबाजी थांबवून सर्वांना एकविचाराने निवडणुका लढण्यास प्रवृत्त करण्याचे असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेमधील ८९ नगरसेवकांमध्ये काँगे्रसचे फक्त १३ नगरसेवक आहेत. संख्याबळ कमी असले तरी पक्षाने पालिकेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला आहे. सभागृहातही सत्ताधारी व प्रशासनास अनेक वेळा धारेवर धरले होते. परंतु यानंतरही विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षाचे काम केल्यामुळे बेलापूरमधील उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. आता नारायण राणे पक्षाची बांधणी कशी करतात, मतभेद मिटवून सर्वांना एकदिलाने काम करण्यास प्रवृत्त करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राणे नाईकांच्या विरोधात रणशिंग फुंकणार की, त्यांच्याशी जुळवून घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या आक्रमकपणाचा पक्षास फायदाच होईल, असे मत येथील पदाधिकारी व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Raineeta' to prevent Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.