मुंबईत पावसाचा १ हजार मिलीमीटरचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:26+5:302021-07-11T04:06:26+5:30
मुंबई : अनुकूल हवामानामुळे मान्सून पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात सक्रिय झाला असून, मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून ...
मुंबई : अनुकूल हवामानामुळे मान्सून पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात सक्रिय झाला असून, मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी मारा केला आहे. पावसाचा वेग असाच कायम राहणार असून ९ जुलैपर्यंत मुंबईत १ हजार ८९ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत शनिवारीदेखील सकाळी बऱ्यापैकी पाऊस नोंदविण्यात आला आहे. सकाळी सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू असतानाच दुपारी मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या २४ तासांत मुंबई २८.४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून, ९ जुलैपर्यंत १ हजार ८९.७ मिलीमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ७०४ मिलीमीटर एवढी आहे आणि टक्क्यांमध्ये मुंबईचा पाऊस ४०.३० टक्के एवढा नोंदविण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ८ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला आहे. ५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तीन ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.