राज्यातील २२ जिल्ह्यांत पावसाची ओढ, पुढील दोन आठवडेही कोरडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 06:26 AM2018-08-10T06:26:44+5:302018-08-10T06:27:13+5:30
यंदा राज्यात सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी आजअखेर २२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
पुणे : यंदा राज्यात सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी आजअखेर २२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याशिवाय पुढील दोन आठवडे पाऊस ओढ देण्याची शक्यता असल्याने शेतीपाण्याच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती आहे.
राज्यात १ जूनपासून ८ आॅगस्टपर्यंतच्या पावसाची तुलना करता २२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ त्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सांगली या दहा जिल्ह्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. लातूर, हिंगोली, वर्धा, अमरावती, भंडारा, यवतमाळ, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर व गोंदिया या १२ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ५ ते १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
>अजून तरी परिस्थिती अनुकूल नाही : हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे़ याबाबत डॉ़ ए़ के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागर व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड या परिसरात पुढील आठवड्यातील बहुतेक दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे़ परंतु राज्यात पावसासाठी अजून तरी अनुकूल परिस्थिती नाही.
>मुंबईत आजपासून आठवडाभर मोठी भरती
मुंबईत मोठ्या भरतीचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होत आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतल्यामुळे तूर्तास पाणी तुंबण्याचा धोका नसला तरी भरतीच्या वेळी समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकला जात असल्याने महापालिकेसमोर सफाईचे आव्हान असणार आहे.
>शुक्रवारी स. ११.११ वा. (४.६० मी.)
शनिवार स. ११.५६ वा. (४.८२ मी.)
रविवार दु. १२.४१ वा. (४.९५ मी.)
सोमवार दु. १.२६ वा. (४.९६ मी.)
मंगळवार दु. २.०८ वा. (४.८५मी.)
बुधवार दु. २.५२ वा. (४.६२ मी.)
>महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे़
-डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी,
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ पुणे