मुंबई : मंगळवारी साजऱ्या झालेल्या बेस्ट दिनानिमित्त शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि बेस्टचा अधिक वापर करणाऱ्या सर्वच प्रवाशांवर प्रशासनाने विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर आणि महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध घोषणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांकरिता आकारण्यात येणाऱ्या सवलतीच्या बसपास मूल्याचे दर कमी करण्यात येणार आहेत. सर्वसाधारण, मर्यादित कॉरीडॉर बससेवांप्रमाणेच १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना वातानुकूलित सेवांवर सवलतीचे भाडे आकारण्यात येणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बससेवेचा उपयोग करणाऱ्या प्रवाशांना आरएफआयडी दैनंदिन बसपासशिवाय दैनंदिन तिकीट प्रवासासाठी देण्याचा निर्णय घेतलेला असून लवकरच ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.सध्या बृहन्मुंबई बसप्रवासासाठी ७० रुपयांचे दैनंदिन तिकीट प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फक्त शहर विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४० रुपये आणि उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० रुपये दैनंदिन तिकीटाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
बेस्ट दिनानिमित्त सवलतींचा वर्षाव
By admin | Published: August 05, 2015 1:56 AM