हवामान बदलामुळे आॅक्टोबर हीटच्या अखेरीस पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:32 AM2018-10-21T06:32:20+5:302018-10-21T06:32:22+5:30
कमाल तापमानात सातत्याने नोंदविण्यात येणारी वाढ आणि अचानक दाखल झालेल्या पावसामुळे तापमानात झालेली घट अशा ‘ताप’दायक बदलत्या हवामानाने मुंबईकरांना घाम फोडला आहे.
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात आलेले ‘तितली’ आणि अरबी समुद्रातील ‘लुबान’ चक्रिवादळ, कमी-अधिक फरकाने नोंदविण्यात येणारे ढगाळ वातावरण, कमाल तापमानात सातत्याने नोंदविण्यात येणारी वाढ आणि अचानक दाखल झालेल्या पावसामुळे तापमानात झालेली घट अशा ‘ताप’दायक बदलत्या हवामानाने मुंबईकरांना घाम फोडला आहे. त्यातच आता हवामान बदलामुळे आॅक्टोबर हीटच्या अखेरीस उन्हासह पावसाच्या हजेरीमुळे मुंबईकर काहीसे सुखावले आहेत.
मुंबईचे कमाल तापमान तीन दिवसांपूर्वी सलग तीन दिवस ३७ अंश नोंदविण्यात येत असतानाच विजयादशमीला रात्री पडलेल्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला. हा गारवा केवळ एक दिवस किंचित वेळेसाठी टिकला. त्यानंतर पुन्हा तापमानात झालेली वाढ, वाढता उकाडा, उष्ण वारे अशा बदलत्या हवामानामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या विचार केल्यास येथील काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
>७२ तासांसाठी परिस्थिती कायम
विजयादशमीला पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र तो फार काळ टिकला नाही. त्यामुळे उकाड्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती पुढील ७२ तासांसाठी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, बदलत्या हवामानाचा ताप उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे.
२१ आॅक्टोबर - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील.
२२ ते २४ आॅक्टोबर - गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान
कोरडे राहील.
२१ आणि २२ आॅक्टोबर - मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील.