लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने जुलै महिन्याचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा अंदाज जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जाहीर केला जाईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
संपूर्ण देशात जुलै महिन्याचा विचार करता उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात पाऊस सर्वसाधारण राहील. मध्य भारतातील काही ठिकाणी सर्वसाधारणच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. महाराष्ट्राचा किनारी प्रदेश आणि सह्याद्री परिसरात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या पूर्वेकडील बाजूस सर्वसाधारणच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. विदर्भात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात देखील तुलनेने कमी पाऊस होईल.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.