पाऊस पडणारच मात्र तीव्रता कमी होणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:39 AM2021-12-02T11:39:42+5:302021-12-02T11:40:23+5:30
Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण, गोवा, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून, गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यामुळे मुंबईत झाली धुक्यात वाढ
समुद्रामुळे हवामानात प्रचंड आर्द्रता वाढली आहे. सरासरी पेक्षा अधिक हवेचा दाब आणि त्यातून वाढलेली जमिनीलगत हवेच्या घनतेसह उत्तरेकडून व वायव्येकडून येणारे शांत थंड वारे, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि तापमानात झालेली घसरण या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे मुंबईत खुप धुके जाणवत असल्याचे भारतीय हवामान खात्याचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कोसळला आहे. याचा परिणाम उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रावर अधिक होत आहे. येत्या २४ तासांसाठी पाऊस कोसळणार असून, या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
असा आहे हवामानाचा अंदाज
२ डिसेंबर : कोकण, गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
३ डिसेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
४ आणि ५ डिसेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.