पावसाचा जोर राहणार सोमवारपर्यंत कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 04:18 AM2019-10-20T04:18:03+5:302019-10-20T06:33:27+5:30
मतदानावर पावसाचे ढग
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई शहरासह उपनगरात आणि ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या परिसरात शनिवारी सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर कंटाळल्याचे चित्र होते. दरम्यान, शनिवारप्रमाणे रविवारसह सोमवारी म्हणजे मतदानाच्या दिवशीही मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
मुंबईचा विचार करता, शुक्रवारी दिवसभर मुंबईवर मळभ दाटून आले होते. दुपारी किंचित पाऊस पडला होता. शनिवारी मात्र दिवसभर पावसाची रिपरिप होती. शहराच्या तुलनेत उपनगरात मात्र पावसाचा जोर किंचित अधिक असल्याचे चित्र होते. दिवसभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाला होता. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने याच चिखलातून विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या रॅली निघत असल्याचे चित्र होते.
कोकणात आज गडगडाटासह पाऊस
२० व २१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गडगडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे़ पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. बीड, उस्मानाबादमध्ये २० व २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़