मराठवाडा, नाशिकमध्ये पावसाचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:31 AM2018-06-21T05:31:54+5:302018-06-21T05:31:54+5:30

राज्यात बुधवारी नाशिकसह लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले.

Rainfall in Marathwada, Nashik | मराठवाडा, नाशिकमध्ये पावसाचे पुनरागमन

मराठवाडा, नाशिकमध्ये पावसाचे पुनरागमन

Next

मुंबई : राज्यात बुधवारी नाशिकसह लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच आहे. नाशिक व हिंगोलीत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. नदी, ओहोळांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण निवती रस्त्यावरील मायनेवाडी सतीमंदिर येथील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने सकाळपासून या मार्गावरील वहातूक पूर्णपणे बंद पडली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला रत्नागिरीसह राजापूर, देवरूख, चिपळूण आदी भागात मुसळधार पाऊस झाला. मंडणगड, खेड, गुहागर, दापोली आदी भागातही दमदार सरी बरसल्या.
नाशिकमध्ये दुपारी जोरदार पाऊस झाला. पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककर त्यामुळे सुखावले. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस झाला. मिठसागरे येथे वीज पडून प्रवीण गणपत कासार (३०) हा युवक मृत्यमुखी पडला. तर देवपूर येथे झाडाखाली बांधलेल्या दोन गायी मरण पावल्या.
मराठवाड्यात लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पाऊस झाला. हिंगोलीत सिनगी खांबा (ता. सेनगाव) येथे विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. वीज पडून संदीप प्रल्हाद लांडगे हा युवक मृत्युमुखी पडला तर एकजण जखमी झाला आहे. परभणीत शहरासह गंगाखेड तालुक्यात सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. लातूर शहरात आठवडाभरानंतर पावसाने हजेरी लावली. रेणापूर शहरासह तालुक्यात जवळपास २० मिनिटे पाऊस झाला. देवणी तालुक्यातील वलांडी, धनेगाव परिसरात तसेच उदगीर तालुक्यातही हलक्या सरी पडल्या.
विदर्भात दोघे जखमी
विदर्भात वाशिममधील लिंगा कोतवाल येथे शेतात पेरणीचे काम करत असताना वीज पडून रामराव देशमुख (५०) व त्यांचा मुलगा अंकुश(२५) जखमी झाले.

Web Title: Rainfall in Marathwada, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस