Join us

Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 8:07 AM

Heavy rain in Mumbai : चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झला आहे.

मुंबई - पावसाने शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 16 जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत चार ते पाच घरे पडली आहेत. (Rainfall in mumbai chembur area many people killed in landslide)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 17 वर गेला आहे. तर 2 जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय,  फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती आहे.

विक्रोळी भागात इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू - 

मुंबईमध्ये  सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. DCP (झोन 7)चे प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

रेल्वे वाहतूक ठप्प -मध्यरात्री झालेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. 

रहिवासी भागात शिरले पाणी -दुसरीकडे कांदिवली पूर्व भागातही जोरदार पाऊस पडल्यामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची झोपमोड तर झालीच शिवाय त्यांना संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या सायन स्थानकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता -जोरदार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि इतर सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून, मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळाले. 

 

टॅग्स :पाऊसमुंबईचेंबूरमृत्यूभूस्खलनइमारत दुर्घटना