मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी सकाळी, दुपारी आणि सायंकाळी थांबून थांबून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. शहरासह उपनगरात कमी अधिक फरकाने हेच चित्र होते. उपनगरात सकाळी काही क्षण कोसळलेल्या सरी वगळता ऊनं आणि मळभ असा खेळ सुरू होता.शहरात उन्हाचे प्रमाण कमी होते तर मोठ्या प्रमाणावर ढग दाटून येत होते. दाटून येत असलेल्या ढगांच्या तुलनेत पाऊस मात्र हुलकावणी देत होता. शहरात सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास आलेली मोठी सर वगळता शहर कोरडेच होते, तर उपनगरात दुपारी किंचित पडलेला पाऊस वगळता उपनगरही कोरडेच होते. एकंदर रविवारी पावसानेही विश्रांती घेतल्याचे चित्र होते.गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून, १५ ते १८ जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ३, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ५, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १३ ठिकाणी झाडे कोसळली. शहरात २, पूर्व उपनगरात ३ अशा एकूण ५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.>मृतदेह आढळलारविवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोरीवली येथील दौलत नगरलगतच्या नदीच्या पाण्यावर एक व्यक्ती तरंगताना आढळला. सदर व्यक्तीस कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने तपासून त्यास मृत घोषित केले.संतोष संदिम (४३) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत पावसाचा लपंडाव; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:17 AM