Join us  

पावसाने मुंबई खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 3:41 AM

एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईच्या पाण्याचे टेन्शन मिटवले आहे, तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास मात्र खडतर होत चालला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईच्या पाण्याचे टेन्शन मिटवले आहे, तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास मात्र खडतर होत चालला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबून रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी, वाहनांची मंदावलेली गती अशा समस्यांनी चाकरमान्यांचा त्रास वाढवला आहे. त्याचवेळी या खड्ड्यातून मुक्तीचा दावा करणाऱ्या कोल्डमिक्सबाबत मात्र पालिकेचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरू आहे.पावसाळ्यात दरवर्षी मुंबईचे रस्ते खड्ड्यात जातात. याचा नाहक त्रास वाहनचालक व पादचाऱ्यांना भोगावा लागत असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासनाने यंदाही परदेशी प्रयोग सुरू केले आहेत. त्यानुसार रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्यासाठी इस्रायली आणि आॅस्ट्रियन कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञानावर कोणत्याही वातावरणाचा परिणाम होत नसल्याने भर पावसातही खड्डे भरणे शक्य असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र मुंबईत खड्डे वाढू लागले तरी या तंत्रज्ञानाचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही.महापालिकेने ३६ टन कोल्डमिक्स आयात केले. ते गेले काही दिवस वरळी येथील गोदामात पडून होते. यापैकी ८० टक्के कोल्डमिक्स पावसाळ्यात व २० टक्के कोल्डमिक्स गणेशोत्सवात पडणाऱ्या खड्ड्यांसाठी वापरले जाणार आहे. मात्र मुसळधार पावसाने रस्त्यांची दुर्दशा करण्यास सुरुवात केली तरी पालिकेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. उलट खड्ड्यांची आकडेवारी लपविण्याची धावपळ सुरू आहे. पण या कोल्डमिक्सचा प्रभाव लवकरच दिसून येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.खड्ड्यांवर वॉच नाही२०११ मध्ये पालिकेने आणलेली पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम प्रभावी ठरली होती. या सिस्टीममुळे खड्डे ४८ तासांमध्ये बुजविले गेले नाहीत तर संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरता येत होते. रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर त्यात बरेच अभियंते अडकले. ही कारवाई अयोग्य असल्याचा दावा करीत अभियंतावर्गाने असहकार पुकारण्याची तयारी केली. पालिकेची पोलखोल करणारे संकेतस्थळ बंद करण्यात आले. तक्रारीसाठी असलेली हेल्पलाइन प्रभावी ठरली नाही. त्यामुळे रस्ते विभागात सावळागोंधळ सुरू आहे.घोटाळ्याने घातले खड्ड्यातरस्त्यांचे काँक्रिटीकरण मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न मिटवेल, असा पालिकेचा दावा होता. मात्र ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याने रस्त्यांची कामे म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे दाखवून दिले. या घोटाळ्यासाठी जबाबदार ठेकेदार, अभियंता, थर्डपार्टी आॅडिट कंपनी या सर्वांवर कारवाई सुरू आहे. परंतु खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा त्रास यानंतरही कमी झालेला नाही. गेले दोन दिवस सतत मुसळधार पाऊस असल्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे.पूर्व उपनगरात रस्त्यांची दैना : निकृष्ट कामामुळे मुंबईत बरेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामध्ये पूर्व उपनगरातील रस्त्यांचा सर्वाधिक समावेश आहे. दादर, वरळी, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले, मालाड, बोरीवली, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर या ठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. पालिकेच्या वरळी येथील कार्यशाळेतून तयार केलेले साहित्य खड्ड्यांमध्ये भरण्यात येते. यामध्ये कोल्डमिक्स, डांबरचे मिश्रण खड्ड्यात टाकून रोलरने ती जागा सपाट केली जाते.