मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले असून, शहरापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर चांगलाच आहे. शहरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असतानाच उपनगरात मात्र पडणाऱ्या सरींनी चाकरमान्यांना चांगलेच झोडपून काढले आहे.उत्तरेसह दक्षिणेकडे आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईवर पावसाचे ढग कायम आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले असून, बुधवारी शहरापेक्षा उपनगरात पावसाचा जोर कायम राहिल्याचे चित्र होते. बुधवारी सकाळी दहा आणि दुपारी बारा वाजताच्या दरम्यान पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, चेंबूरसह पश्चिम उपनगरात अंधेरी, गोरेगाव, बोरीवली आणि जोगेश्वरी येथेही पावसाच्या दमदार सरी बरसल्या. तर शहरात सायन आणि माटुंगा वगळता दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत पाऊस फार काही बरसला नाही.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. समुद्रसपाटीवर गुजरात ते केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात केरळच्या किनाऱ्यालगत आहे. कोकण आणि गोव्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस सक्रिय आहे. (प्रतिनिधी)
मुंबईच्या उपनगरात पावसाचा जोर कायम!
By admin | Published: September 11, 2014 1:26 AM