नवी मुंबई/ पनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पनवेल तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबईतही अनेक भागात पाणी साचले होते. बुधवारी रात्रीपासून पनवेलमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर या ठिकाणी रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले होते. महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती. पावसाचा जोर वाढत गेल्याने चाकरमानी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. आज ७० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने धोदाणी आणि मालडुंगे या दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. त्याचबरोबर या भागातील मोबाइल सेवाही खंडित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गाढी आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात आज प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांनी तातडीची बैठक बोलावून आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार पवन चांडक, गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, नायब तहसीलदार अधिक पाटील, सुहास खामकर यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकाऱ्यांनी चिखले, वारदोली, माखुर्ली त्याचबरोबर वाजापूर येथील पिंपळवाडी या पूरसदृश गावांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मालडुंगी आणि धोदाणी या परिसरात वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तसेच या गावांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुमंत भांगे हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून ते याबाबत अपडेट घेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
पनवेल, नवी मुंबईला पावसाने झोडपले
By admin | Published: August 01, 2014 3:45 AM