Join us

मुंबईसह पुण्यात पावसाच्या सरी बरसणार; अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळाचं सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 9:33 AM

Mumbai Rain Update : अरबी समुद्रात एकाचवेळी २ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई - गुरुवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. अशातच अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील २४ तासांत हे वादळ निर्माण होणार असल्याने मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

अरबी समुद्रात एकाचवेळी २ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पवन आणि अम्पन अशी वादळाची नावे आहे. कोकणाला सोबा चक्री वादळाचा धोका निर्माण झाल्यानंतर धोक्याचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आलं आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता खबरदारी म्हणून धोका टाळावा असा इशारा दिला आहे. 

४ आणि ५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. 

पावसाचे काय कारण?दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडूमध्ये उत्तर-पूर्व मान्सून सक्रीय झाला आहे. त्यातच अरबी व हिंदी महासागरातील लक्षव्दिप जवळ चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे हा बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राकडे सरकत आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पावसासह वाऱ्याचा वेग जोरात राहू शकतो. 

टॅग्स :पाऊसचक्रीवादळहवामानमुंबई मान्सून अपडेट