पावसाचे धुमशान - कोकणात अतिवृष्टी ; पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना पूर; मराठवाडा, खान्देशातही मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 04:57 AM2017-08-30T04:57:01+5:302017-08-30T04:58:03+5:30
मुंबईत आकाश फाटले असतानाच मंगळवारी राज्यतही सर्वदूर धो-धो पाऊस कोसळला. कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या असून धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याने
मुंबई/पुणे : मुंबईत आकाश फाटले असतानाच मंगळवारी राज्यतही सर्वदूर धो-धो पाऊस कोसळला. कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या असून धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर अजून तीन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर होता. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढविण्यात आल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सांगली जिल्ह्यातही जोरदार वृष्टी होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दुपारी विसर्ग सुरू करण्यात आला असून वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरणात चोवीस तासांत २.८९ टीएमसीची वाढ झाली. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणात ९६.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सातारा, महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण, वाई तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. मांढरदेव घाटात दरड कोसळली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोकणात
धुवाधार
कोकणातही पावसाचा जोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून चिपळूणमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी व शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही चिपळूण शहराच्या काही भागात पाणी घुसले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.
खान्देशातही दमदार
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अमळनेर येथे दुपारी दमदार तर चाळीसगावात दिवसभर मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. नंदुरबार जिल्ह्यातही दमदार सरी बरसल्या. नंदुरबार आणि शहादा शहरात भरलेल्या आठवडे बाजारांची दाणादाण उडाली होती़ धुळे जिल्ह्यात१२६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरपूर तालुक्यात सर्वाधिक ९३ मि.मी. तर सर्वात कमी २ मि.मी. पावसाची नोंद साक्री तालुक्यात झाली. शिंदखेडा तालुक्यात २४ मि.मी. पाऊस झाला.
विदर्भातही पाऊसधार
विदर्भात अकोट १००, अर्जुनी मोरगांव, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९०, देसाईगंज, तुमसर ८०, अकोला, रामटेक, तिरोडा ७०, अहेरी, ब्रम्हपुरी, मलकापूर, मुर्तिजापूर, पारशिवनी, साकोली, सेलू, सिरोंचा ६०, चामोर्शी, कळमेश्वर ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़
हवामान विभागाचा इशारा :
३० आॅगस्ट : कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता़ मध्य महाराष्ट्रात तुरळक
ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़
३१ आॅगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़
मध्य ओडिसा व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होऊन ते आता नैर्ऋत्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे़
तसेच दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगतच्या भागावर द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे़ यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रासह दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश परिसरात जोरदार पाऊस पडत आहे़
मराठवाड्यातही जोरधार
मराठवाड्याच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस झाला. परभणी जिल्हात जोरदार पाऊस झाला. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प झाली होती.