Join us

पावसाचे धुमशान सुरुच

By admin | Published: July 31, 2014 12:51 AM

गेल्या चोवीस तासात सावित्री नदी किनाऱ्यावरील महाड येथे ३७ मिमी तर पोलादपूर येथे ६७ मिमी

बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात १४० मिमी तर बुधवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या सहा तासात १२७.७० मिमी पाऊस महाबळेश्वर येथे झाल्याने आज पहाटेपासून महाबळेश्वर डोंगर रांगांत उगम पावून पोलादपूर-महाड तालुक्यांतून जाऊन अरबी समुद्रास मिळणाऱ्या सावित्री नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन ६.५० मीटर झाल्याने महाड व परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात सावित्री नदी किनाऱ्यावरील महाड येथे ३७ मिमी तर पोलादपूर येथे ६७ मिमी अशा मर्यादित पावसाची नोंद झाल्याने सावित्रीची जलपातळी सध्या ६.५० मीटरवर स्थिर असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षांच्या सूत्रांनी दिली आहे.पोलादपूर : गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यात नद्या, नाले, ओहोळ तुडुंब भरुन वाहत आहेत. सावित्री नदीला पूर आल्याने सावित्री नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तुर्भे पुलावरुन पाणी गेल्याने तुर्भे विभागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.तुर्भे पुलावरुन सुमारे ३ ते ४ फूट पाणी वाहत असल्याने सकाळी पोलादपूर येथे शाळा, कॉलेजमध्ये आलेले विद्यार्थी दुपारी १ वाजेपर्यंत लोहारे येथे अडकून असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, संततधार बरसणाऱ्या पावसामुळे कोंढवी, कोतवाल, देवळे, तुर्भे, सवार - धारवली,मोरसडे आदी विभागातील नद्यांना पूर आले असून सर्वत्र नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने पूर सदृश परिस्थिती पहायला मिळाली तर अनेक ठिकाणी सखल भागात भात पिकात पाणी शिरल्याने भातपिके पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले.कापडे - कामध्ये रस्त्यावर खडकवाडीजवळ दरड रस्त्यावर आल्याने आडावले, मोरसडे, कामध्ये साखर आदी विभागातील जनजीवन विस्कळीत झाले असून संततधार पावसाने सर्वत्र पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.