मुरूडमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस; गारांची वृष्टी
By admin | Published: October 5, 2014 11:04 PM2014-10-05T23:04:38+5:302014-10-05T23:04:38+5:30
मुरूड तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आलेल्या मुसळधार पावसाने परिसरात अपरिमित हानी केली
आगरदांडा : मुरूड तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आलेल्या मुसळधार पावसाने परिसरात अपरिमित हानी केली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारांची वृष्टी झाल्याने शहरात १ गंभीर जखमी झाला. घरांची छपरे, पत्रे, कौले उडाली, नारळाची झाडे, विजेचे खांब पडल्यामुळे संपूर्ण रात्र तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर आंब्याची झाडे, नारळाची झाडे पडलेली दिसत होती. या घटनेमुळे मुरूड व आजूबाजूची गावे भयभीत झाली होती.
वाणदे, शिघ्रे, उंडरगाव, अंबोली, आगरदांडा आदी गावांना याचा प्रचंड फटका बसला. सोसाट्याच्या या वादळी वाऱ्याने घरांवरचे छत व त्यावर नारळाची झाडे व तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. शहरात आलेल्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनावर नारळाची झाडे पडून नुकसान झाले आहे.
पावसामुळे शहरातील नुकसानीचे वृत्त कळताच तहसीलदार लक्ष्मण गोसावी व गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व सर्व तलाठ्यांना पंचनामे करून अहवाल देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त सर्वच नागरिकांचे शंभर टक्के पंचनामे केले जातील या कार्यवाहीपासून कोणीही उपेक्षित राहणार नाही याची दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.